Sunday, June 19, 2016

गणिती नि त्यांची कुंडली- एक अभ्यास


       
       
 फार पूर्वी, २०१०च्या जून-जुलै मध्ये, लिहिलेला एक विनोदी लेख. मूळ  लेख इथे टाकला होता.
या लेखामधील गणित चुकीचे असण्याची शक्यता फारच कमी आहे, ज्योतिषविषयक संकल्पना चुकल्या असण्याची पूर्ण खात्री मात्र मला आहे. ऐकिवातील ज्योतिषविषयक माहितीवर हा लेख बेतला आहे. केवळ मनोरंजन आणि गम्मत मानून वाचवा. आमच्या काही मित्राच्या मते लेखन शैलीवर पुलंचा प्रचंड प्रभाव जाणवतो. हे मी अगदीच मान्य करतो. आणि फार विचार करूनही या लेखातून पुलंचा प्रभाव कसा काढायचा हे मला अगदीच कळलं नाहीये. पण, साहित्य हे माझे क्षेत्र नसल्याने आणि पुलंबद्दल फार आदर नि प्रेम असल्याने आताशा हा प्रयत्न मी सोडून दिलाय!

या लेखामध्ये काहीच मिरच्या नाहीत. हाती चहाचा पेला घेऊन वाचा!

  गेले काही दिवस ज्योतीषशास्त्राशी, या न त्या कारणाने बराच संबंध येत होता. आणि एक दिवस एका उच्च शुद्ध 
गणित शिकणार्या मित्रासोबत (तो उच्च शुद्ध गणित शिकतो म्हणजे हायर प्युअर मँथेम्याटिक शिकतो, प्रस्तुत प्रकार काय आहे याची लेखकासही पुरेशी कल्पना नाही, परंतू काहीतरी लई भारी असावे अशी समजूत आहे!) गप्पा मारण्याचा योग आला. त्याच्या सोबत बोलत असता इतरही उ. शु. . शि. लोकांबाबत ऐकावयास मिळाले नि उगाच या लोकांच्या पत्रिकांचा अभ्यास सुरु केला. परंतु, प्रस्तुत अभ्यास करताना लेखकाच्या दृष्टोत्पत्तीस काही खरेच जबरदस्त योग नि ग्रहस्थिती आल्या ज्या या सर्वच उ. शु. . शि. लोकांबाबत समान होत्या. बर्याच ज्योतीषशास्त्र्यासोबत चर्चा विनीमय केल्यानंतर, असे मत पडले की या स्थिती साडे पंचावन्न लाख ब्याण्णव हजार आठशे एकोणीस लोकांपैकी एकाच मनुष्याच्याच पत्रिकेत दिसून येतात नि ज्यांच्या पत्रिकेत या दिसतात ते उ. शु. . शि. लोक होतात! (वरील आकडा हा एका हायर प्युअर स्टँटिस्टीक करणार्या मित्राने बर्याच अभ्यासांती सुचवला आहे). प्रस्तुत लेखात, लेखक आपले गणित्यांविषयीचे ज्योतीषशास्त्रविषयक मत मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
         गणित म्हणताच सामन्यतः लोकाच्या पोटात गोळा येतो. मासनशास्त्रामधे तर गणिताची भीती असा एक मानसिक आजाराचा प्रकारच आहे! त्यमुळे उ. शु. . शि. लोक (बहुतांशी) मेष राशीचे असून त्यांना मानसिक विकार झाल्याने ते गणित शिकतात असा आमचा पहिला कायास होता. अथवा गणितासारख्या बलाढ्य शत्रूसोबत (ज्या शत्रूने सर्वांची मारणार्या आमच्या पुलंनाही सोडले नाही) लढणारे लढवय्ये असतील अशी आपेक्षा होती. पत्रिकांचा अभ्यास करून असे दिसले की भौगोलिक पातळीवर त्याचे वितरण झाले आहे. ते असे, उत्तर भारतामध्ये (उदा. बंगाल राज्य) गणिती पहिल्या प्रकारात मोडतात नि दक्षिण भारतातील गणिती दुसर्या प्रकारात येतात. महाराष्ट्रासारख्या मध्यभारतातील गणित्यांमधे दोन्ही कारणे कमीअधिक प्रमाणात सापडतात. त्यातही पुण्यातील गणिती हे कशातच नसून त्यांची तिसरीच क्याटेगरी आहे असे आढळले. आम्ही महाराष्ट्र नि पुणे अशा दोन ठिकाण्याच्या गणित्यांबाबत बोलू. तत्पुरवी एक खुलासा, पुण्यातील गणिती म्हणजे पुणेकर नव्हे. पुण्यातील गणिती म्हणजे खुद्द पुणे, मुंबई, रत्नांग्री अथवा चिपळूण सारखे नाकात बोलणारे कोंकणी गाव वा सातार्याजवळील कोणतेतरी दणकट नाव असणारे गाव अशा ठिकाणाहून फर्ग्युसन काँलेज,पुणे येथे अथवा शि.प्र. मंडळींचे एस्.पी. काँलेजमध्ये किंवा फारच वेळ पडली तर पुणे विद्यापीठात बी. एस्सी. वा एम्. एस्सी. केलेले लोक होत
 
        गणितासारख्या दणकट विषयाला तोंड द्याचे म्हणजे यांना युद्धदेवता प्रसन्न असणे गरजेचे आहे. त्यामुळे यातील सर्वांचाच मंगळ कडक असतो. जितका मंगळ कडक तितके हे पुढे जातात. मंगळामुळे याचा अपिअरन्स हा बराच खमक्या असतो. ते बी, एस्सी. प्रथम वर्षात बरेच एकलकोंडे, भितीदायकरीत्या शांत परंतु विद्वान वाटतात.सुरुवातीच्या काळात लोकांशी फारसे न बोलणे, लेक्चरला मास्तरला कळणार नाही अश्या बौद्धिक अर्ग्युमेंट देणे, आयटम म्हणवल्या जाणार्या मुलीकडे ढुंकूनही न पाहणे, सर्वाना झोप आणणार्या रिअल अँनालिसीस सारख्या विषयाला थिअरम लिहून होण्यापुर्वीच प्रूफं देणे, सोपे असल्याने सार्या वर्गाला आवडणार्या प्लेन जिओमेट्रीसारख्या विषयास "ट्रिव्हीअलच आहे...!” असे काहीतरी संबोधणे असे प्रकार केल्याने पहिल्या वर्षी यांच्याभोवती एक गूढ विद्वत्तेचे वलय निर्माण होते. यांचा बुद्धीदाता गुरु मंगळावर बराच अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, ज्याचे फलस्वरूप हे लोक केवळ बौद्धिक मारामारीच करतात. या दोन टोकाच्या ग्रहांमध्ये एक मजेशीर चढाओढ चालू असते. अक्कलवान गुरु यांच्या बारावीच्या अखेरीस कायमच बलवान ठरतो (कारण अजून सापडले नाही), ज्यामुळे हे लोक "आपण फिजीक्स करुयात" असा खुपच नेटका नि व्यवहारीक निर्णय घेउन फर्ग्यसन वा एस्.पी. मध्ये येतात. मात्र बलवान नि कुरापाती मंगळास दिड-एक वर्षे स्टिफन हाँकिंगच्या पुस्तकातील सापेक्षतावाद, पुजकसिद्धांत व दोरीसिध्दांत (स्ट्रिंग थिअरी) यांशिवाय काहीच भांडायला न मिळल्याने तो यांना गणिताकडे आकर्षित करतो नि यांची दशा सुरू होते. साधारण सेकंड ईयरच्या मध्यापासून हे लोक फिजीक्सच्या क्लबमध्ये बसून तिथल्या लोकांना काही फिजीकल फिनोमिनोन आईनस्टाईनलाही झीट आणेन अशा अगम्य गणिती भाषेत "एक्सप्लेन” करतात. हा प्रकार दोन- तीनदा घडला की त्यांना आपल्या "वेगळेपणाची” जाणिव होते नि मग ते फिजीक्सचा नाद सोडून, मँथेम्याटिक डिपार्टमेंटच्या कोण्या फेमस असणार्या (म्हणजे ज्यांचे लेक्चर सेमिस्टरच्या अखेरीस हाउसफुल्ल असते नि शेवटापर्यंत एक किंवा दोनच जण शिल्लक राहतात, ज्यातील एकजण फर्स्ट ईयरला रुडीनचे पुस्तक वाचू लागतो नि सेकंड ईयरला त्याला ते कळू लागते) अशा प्राध्यापकांच्या सोबत बराच काळ व्यतीत करू लागतो.
       
       अशा माणसाची स्त्री राशी असेल, म्हणजे वृषभ, कन्या, मीन किंवा तुळेसारखी एखादी सौम्य रास असेल, तर ह्यांना मित्र होतात. आयुष्यतील काँलेज जीवनातील अमुल्य क्षण हे डिपार्टमेंटच्या लायब्ररीत बसून १९६० सालातील बुर्बाकी नामक प्राण्याच्या अगम्य भाषेतील नि हायरोग्लिफी नामक ईजिप्शिअन चित्रलिपीस लाजवेल अशा लिपीत लिहीलेल्या पुस्तकातील 'पहिले पान' वाचण्यासाठी खर्ची घालू लागतात. वरील फेमस असणार्या मास्तरसोबत बोलत असताना त्याच्या तोंडातून ज्या ज्या जर्मन, ईंग्रज वा अमेरीकन गणित्यांची नावे बाहेर फेकली गेली आहेत, त्या त्या गणित्यांची पुस्तके एकलकोंडया लायब्ररीत जाउन उत्खनन करून शोधून काढतात. त्यातींल गूढ भाषेतील मजकूर एखाद्या कोर्या पानावर उतरून काढू लागतात. यांचा प्रेमग्रह शुक्र स्वस्थानी असेल तर, इथे लायब्ररीत हे कधी कधी न्हाणीघरातून ओरडत आलेल्या आर्किमीडीजसारखे नाचतात, ओरडतात - गणिताच्या प्रेमामुळे...! चुकून कोणी मित्र असणारा मनुष्यप्राणी तिथे असलाच, तर त्याने पृच्छा केल्यावर "काय भारी जिओमेट्रिकल इंटरप्रिटेशन दिलेय ह्याने, ह्या अँबस्ट्रँक्ट आयडियेचे... मला कधी वाटलेच नव्हते असा विचार करावा.. तरीच लेकाचा इतका महान झाला... बाप माणूस रे, बाप माणूस..!!". यात वाक्यात त्याने कोणाचा उद्धार केला आहे की  कौतुक केले आहे, हे आपण ठरवू नये, ते शुक्राने काढलेले प्रेमाचे उद्गार आहेत. तेच पुस्तक, त्याच टेबलावर बसून हे लोक महिनो न् महिने वाचतात. कोर्या कागदावर काही खाणाखुणा करतात. (थोडे बाजून येऊन, या शुक्राच्या टोकाच्या गणितप्रेमाचा एक किस्सा असा की - आमच्या एका इतिहास शिकणार्या एका मित्राला चुकून असा एक कागद कोण्या गणित शिकणार्या मित्राच्या खोलीत हाती लागला होता. त्याने तो ऐतिहासीक दस्तैवेजाची प्रत असावी असे वाटून तो ढापला नि दोन दिवसांनी तो "काय सुंदर कविता आहे प्रचीन मोहेंजोदडो लिपी मधली, रामायण हे मुळात वाल्मिकीने लिहीलेच नव्हते याचा हा जिवंत पुरावा आहे, कुठून काँपी केलेस हे..." असे काहीसे ओरडत, त्या गणिती मित्राच्या खोलीवर आला नि तो बाहेर आला तेव्हा त्या दोघांतील "बौध्दिक चर्चा" त्याच्या डोळ्यावर, गालावर नि सदर्याच्या ऐतिहासीक वाटणार्या बटणांवर स्पष्ट दिसत होती.) 

    इतर लोक मल्टिप्लेक्समधे नव्या इंग्रजी सिनेमातील भारी स्टंट पाहत असतात वा नाजुक हिराँईणीच्या जीवणीचे निरीक्षण करीत असतात, तेव्हा हे लायब्ररीतल्या एकलकोंडेपणाला मिठ्या मारत, एखाद्या अल्जेब्रोजिओमेट्रिक कल्पेनच्या पाप्या घेत असतात. असा हा यांचा स्वस्थानीचा शुक्र. फावल्या वेळात मित्रासोबतकटिंग चहा मारत हे लोक काँलेज जीवनातील शिल्लक थोटके उचलतात नि आयुष्यभर या थोटकांचे वर्णन करीत "काय रे मजा करीत असू ना रे आपण तेव्हा...!!” अशी वाक्ये मारतात. यांच्या हट्टी मंगळामुळे यांना या कालावधित फिजीक्स, केमेस्ट्री, स्टँटिस्टीकस्, ईंजिनीआरींग वा इलेकट्राँनिक्स अशा विषयांचा राग येऊ लागतो. एक फार महत्वाची बाब अशी की पुरूषी ग्रहांच्या प्रभावाखाली असल्याने ह्या लोकांना बायोलाँजी सारखे बायकी विषय अगदीच डोक्यात जातात. शिवाय, याच पुरूषीप्रभावामुळे उ. शु. . शि. लोकांत मुली/ स्त्रीया फार कमी आढळतात. त्या असल्याच तरी एकतर त्याना हे क्षेत्र पावत नाही वा सर्वसामान्यजन त्यांना स्त्री म्हणायला धजवत नाहीत (रेफरंस- एमी नाँयदर नामक (स्त्री) गणितीचा कुठलाही फोटो)! परंतु, सोफिया कोवालेस्की सारख्या सुंदर गणितीयुवतीची पत्रिका जरा गोंधळात पाडणारी आहे, त्यावर अभ्यास चालू आहे.

     तथापि या लोकांचा बुध नि गुरू यांच्या मंगळाने केलेल्या काबाड कष्टांचे फळ यांना अखेरीस देतो नि हे लोक एखाद्या ईंन्स्टीट्युट आँफ नँशनल आँनर मध्ये बरेच यश संपादन करून दाखल होतात. यांचा आपली भाषा, पुणे, आपले शिक्षक, आपले महाविद्यालय (जे एकतर फर्ग्युसन किंवा एस्. पी. असते) यांचा बराच अभिमान असतो. यांना पुलंसारखे मराठी साहित्यिक जीवापाड आवडतात. ईंग्रजीत यांची आवड शेरलाँकच्या साहसकथा वा पी. जी. वुडहाउससारखा १८००शे च्या काळातील लेखक असतो. हे नवे सिनेमे पाहत नाहीत. भर फर्ग्युसनच्या रस्त्यावर सकाळी दहाच्या पुण्यघटिकेला बंडी नि काका लोकांची काँटन जीन्स्, वा अमेरिकेतील कोणताही स्कँलर घालत असेल असा पोषाख किंवा यांचे आदर्श असणार्या प्राध्यापकाप्रमाणे फुलबाह्यांचा मास्तरी शर्ट घालून ह्रितीक रोशनलाही लाजवेल अशा आत्मविश्वासात आजूबाजुच्या स्वर्गसुखाकडे अजिबात ध्यान न देता चालत असतात. यावेळी यांना "काय रे, काय चालू आहे?” असा प्रश्न विचारला असता "काल सरांनी दिलेल्या सेट आँफ ईनफाईनाईटली डिफरंशियेबल काँम्प्लेक्स व्ह्याल्यूड फंक्शनस् आँन क्लोज्ड ईंटरव्हल झीरो टू वन वरती एखादी सेन्सिबल कंम्प्लिट मेट्रीक त्याचे व्हेट्कर स्पेस स्ट्रक्चर डिस्ट्राँय न होउ देता टाकता येतीये का,,,,,,, ह्याचा विचार करतोय...!!!!” असले भन्नाट उत्तर खणखणीत पुणेरी आवाजात देऊन प्रश्नकर्त्याला नि आजूबाजूच्या रंभा-मेनकांना एका क्षणात झीट आणू शकतात! पण याचा अर्थ ते भाव खातात असा नसतो. यांच्या गुरुच्या विद्वत्तेमध्ये नेपच्युनचा एक लहान मुलाचा भाबडा भाव दडलेला असतो. त्यांना विद्वत्तेचा भाव खायचा नसतो. गणिताप्रमाणे दिलेल्या प्रश्नाचे खरे उत्तर ते देतात. त्या उत्तरात अहंपणाचा दर्प कमी सत्यवादीपणाच जास्त दडलेला असतो. ह्या सत्यवादीपणामागे नेपच्युनचा हात किती नि गणितामुळे अंगी बाणलेला खरेपणा किती हा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. मात्र हा खरेपणा त्यांच्या सामाजिक आयुष्यत बराच गोंधळ उडवतो. ह्यांना एखादी मुलगी आवडली तर "मुलगी हे नाजुक प्रकरण असते, तिला खुप सांभाळून हाताळून मग प्रेमात पाडायचे” असला मित्रांनी दिलेला मंत्र याना कधीच पटत नाही. एखाद्या थिअरमचा प्रूफ लिहावासे ते थेट जाऊन "माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझे आहे का..” किंवा "माझ्याशी लग्न करशील का...” असा बोबडी वळवणारा प्रश्न विचारतात. स्वाभाविकच तिथल्या तिथे नाही हेच उत्तर मिळते नि दोन दिवसात पठ्या "ठिकाय, हे थिअरम चुकीचे होते...” असे म्हणत नाँर्मललाही येतो! “लाँ आँफ एक्सक्लुडेड मिडल” भोवती फिरणारे हे आयुष्य!! 

     यांचा शनी फारच मजेशीर वागतो. तो कारण नसताना वैर असणार्या गुरूसोबत कित्येकदा युती करतो. शनि म्हणजे सत्यवादीपणा नि साधेपणाचे प्रतिक. त्यात त्याला गणिताची साथ. मग काय विचारता काय घडते! अशा युतीच्यावेळी फार मजेशीर प्रसंग उद्भवतात. जसे, यांचे नि फिजीक्सच्या किंवा इलेकट्राँनिक्सच्या मास्तरचे पटत नाही. आता ही युती यांना इतरांप्रमाणे गप्प देत बसू नाहीत. नेमके प्रँक्टिकलच्या आदल्या दिवशी त्या मास्तरला जाऊन "तुम्हास इलेक्ट्राँनिक्सच काय पण साधा ओहमचा नियमही कळत नाही” किंवा "माझ्या फिजिक्सवरून मँथला शिफ्ट होण्याला तुमच्या सारखे फिजिक्सचा "एफ्”ही न कळणारे शिक्षक जबाबदार आहेत” असले कातील डायलाँग मारतात. आणि दुसर्या दिवशी, हाच प्राध्यापक प्रँक्टिकलला येतो! विषय किंवा वरील वाक्य बोलायची वेळ चुकली तरी वरीलपैकी एखादे तरी वाक्य एकदा तरी एखाद्या तरी प्राध्यापकासमोर यांनी म्हटलेले असतेच. परंतू येणार्या संकटातून गुरु यांना नक्की वाचवतो.ह्या शनी-गुरु युतीचा त्रास कधी कधी ह्यांच्या आजूबाजुच्यांनाही भोगावा लागतो. सामान्य माणसे ज्याला भांडण म्हणतात, त्या प्रकारात ह्यांना घेतलेच तर हे ज्या गटात आहेत त्याच गटाला ही युती भोवू शकते.(हे गणिती लोक ज्याला भांडण म्हणतात, तो जरा वेगळा प्रकार असतो. इंटिग्रेशन म्हणजे “एरीया अंडर कर्व्ह” असे एकल्यावर हे जे करतात, त्या भांडण म्हणू शकता, अस्तु) म्हणजे तुम्ही याला आपला मित्र म्हणून घेतले नि तुम्ही समोरच्या आडदांड पोराला धक्का दिला नाही, असे समजावून सांगत आहात. तर फार फार वेळाने हा अगदी वैतागून मध्ये येऊन, संताप रोख अत्यंत संयमाने म्हणेन "हे पहा, तुम्हाला जर शाब्दीक चकमकीतून काहीच निर्णय घेता येत नसेल, तर कृपया असे उभे राहण्यापेक्षा पुढील पाउल उचला. एकतर शारीरिक हमरितुमरिवर या किंवा आपण सारेच घरी जाऊयात!”... आणि असा संवाद झालाच तर पुढील प्रसंगाची कल्पनाच केलेली बरी! किंवा तुमच्या प्रेयसीच्या घरी तिच्या खडूस बापासोबत लग्नाबाबत बोलण्यासाठी तुम्ही यांना नेत असाल, तर आधी खातरजमा करुन घ्यावी की यांच्या कोणत्या ग्रहांची युती असून त्यातील कोणता ग्रह प्रभावी आहे. जर गुरु-मंगळ युती आहे, गुरू प्रभावी आहे नि तुम्ही या मित्रास सांगितले आहे की "काहीही हो, लग्न जमलेच पाहीजे” तर तुम्ही नशिबवान आहात. कारण मग याची विद्वत्ता, योग्यवेळी दिसणारी कठोरता नि तुम्ही सांगितलेला "एक्सपेक्टेड रिझल्ट” यांचा असा काही मिलाफ होईल की रिटायर्ड, कडक मिशांचा कर्नल मराठेही लग्नास हो म्हणेन! पण तेच गुरु-शनी असा बेत नि शनी मजबूत आहे व तुम्ही जताना वैतागून म्हणाला आहात "साला टकला समजतो काय स्वतःला... अरे, ह्यची पोरगी काय एकटीच आहे काय मला... अगदी नारायणात गेलो तर शंभर पोरी आय लव्ह यू म्हणतील...”....  तर हा प्राणी पोरीच्या बापाने तिसर्यांदा नाही म्हटले की म्हणेन "तुम्ही विचार करून नक्की नाही म्हणताहात..?”
         “मग काय अविचार करून याला पोरगी देऊ..?”
         “ठिकाय मग, वश्या सोड रे.. तूच म्हणालास ना मघा नारायणात शंभर पोरी तुला हो म्हणतायेत, सोड काय अडलेय अशा जुन्या विचारांच्या लोकांवाचून तुझे... कोणीतरी रँशनल विचारांचे कुटूंब पाहून, नीट विचार करून आयुष्याचा हा निर्णय घे!”..........
........ तर हे "रँशनल”, “जुन्या विचारांचे लोक” असे वाक्प्रचार जुळवणे हे गुरूचे काम नि सरळपणे आडमार्गी न जाता तुम्ही सांगितलेल्या 'लेमा' चे अँप्लिकेशन करणे नि थिअरम प्रुव्ह करणे हे ठेच लावून घेण्याचे शनीचे काम!  पुन्हा एकदा, दोष तुमच्या मित्राचा काहीच नाही!

     तर असे हे सरळमार्गी लोक कित्येकदा अचानक न समजण्या इतके अँढव्हान्स वागतात. अशा वेळी गोंधळायला होते. म्हणजे, अचानक ते डिस्कोमधे जातील किंवा एखादा नवा मँचिग टी-शर्ट नि छानशी जीन्स घालून खरेच छान दिसतील (!), एखादा महागडा मोबाईल घेतील. पण, अशा वेळी गोंधळण्याचे कारण नाही. या वेळी समजून घ्यावे की यांची गुरुची महादशा सुरू झालीये. ते अशा वेळी जुन्या थिअरी टाकून नव्या थिअरी वाचू लागतात. पुस्तके सोडून "अमेरीकन मँथेम्याटीकल मंथली” मधील नवे पेपर वाचू लागतात. त्यांना समाजात आपण वावरण्याची गरज आहे असे निष्कारण वाटू लागते. लेक्चरमधे ते गणितातील जुन्या कल्पनावर टिका करतात. सर्वांत धक्कादायक म्हणजे ते फिजीक्स-इंजीनिआरींगच्या लोकांना मान देऊ लागतात! (पण याचा अर्थ असा नाही की त्यांचे ओचकारे काढणे थांबवतात). या गणिताच्या लोकांचे साडेतीन मुहुर्तही असेच नवलाईपूर्ण असतात. यांचा गुरुपुष्ययोग म्हणजे ज्या दिवशी हे "फंक्शन” ऐवजी "फंक्टर”, “सेट” ऐवजी "क्याटेगरी” नि "म्याप” ऐवजी "मँर्फीझम्” असले काही शब्द बडबडू लागतात. या वेळी यांचा पूर्ण कायापालट होतो. या योगानंतर पत्रिका कशी बदलते नि कोणता ग्रह कसे काम करतो, हे आमच्या कित्येक अनुभवी, जाणकार ज्योतीष मित्रांनाही सांगता आलेले नाही. (स्वाभाविकत:) पुण्याचे असणारे प्रसिद्ध ज्यो.विशारद दामोदर नरहरपंत चिरपुटकर, हे सध्या या विषयावर काम करीत आहेत, असे नुकतेच कळलेय.  

या गणित्यांना मंगळाची बाधा फारशी होत नाही. झालीच तर, एखादे फंक्शन कंटीन्युअस आहे का, असा वाद हे आपल्या सोबत्या सोबत घालतात. नि त्याच्याशी, मागे सांगितलेल्या प्रमाणे "भांडण” करुन दमतात, तेव्हा रात्री झोपताना दोघांना एकाचवेळी जाणवते की ते मुळी "फंक्शनच" नाही. मग एसेमेस करुन, तो वाचत, दोघे सुखाने झोपतात. आपण ओळखलेच असेल की दोघांचीही मंगळाची बाधा चालू होती. शनी यांना काही करू शकत नाही. कारण, एरवीच बापडे कोणत्या ना कोणत्या प्रश्नावर काम करीत असतात. शनिमहाराज काय नवा प्रश्न उभा करणार! परंतु, कोणाला झालाच खुप त्रास तर तो असा होतो- आठवडाभर खुप काम करून एखादा प्रश्न सोडवावा नि तो मित्राला सांगताना तीन तासाने कुठे तरी छोट्या पाय-π एवजी मोठा पाय- П लिहिलाय असे लक्षात येउन मनःस्ताप होतो. पुढे हीच घटना अल्फा, बीटा,... यांबाबत घडते. शनिमहाराज किती रुष्ट आहेत यांचे परिमाण रोमनमधील किती अक्षरे चुकलीत, हे आहे. यांना राहू-केतू सतावत नाहीत. उलट एखाद्या राहू-केतूने त्रास द्यावयाचा ठरवला, तर अशा माणसाची मैत्री यांसोबत होते, त्याच्या लग्नाच्या वाटाघाटी हे लोक वरिल प्रमाणे "गुरु-शनि युती” असताना करतात. किंवा एखाद्यास कडक शनि असल्यास गणिताच्या न सुटलेल्या पेपराचा तिसरा अटेम्प्ट करताना, परिक्षेच्या आदल्या रात्री आपल्या जवळच्या गणिती मित्राकडे जातो. हा गणिती मित्र त्याला परीक्षेसाठी लागणार्या गोष्टींमधील इन-साइट सांगतो, त्यांमागील प्रेरणा नि विविध इंटरप्रीटेशनस् आख्खी रात्रभर सांगतो. आणि परीक्षेसाठी लागणारे काहीच पहायला न मिळण्याने एरवी त्याला जी सुत्रे वा सिद्धता आठवत असतात, त्यासुद्धा तो यावेळी परीक्षेपुर्वी विसरलेला असतो.
    गणितीलोकांना सर्वांत दुःसह ठरू शकणारी (नि आपणास विनोदी ठरू शकेन) अशी महादशा म्हणजे, शुक्राची महादशा! तो तर गुरुच्या वा नेपच्युनच्या घरात शिरला, तर उत्तमच. अशा माणसाचा मग प्रेम विवाह होतो. मुलगी शोधण्याची यातायातही पडत नाही, त्याची बायको ही त्याची विद्यार्थीनी असते. शनिची कृपा झाली तर ती परदेशी असते. मात्र ती या माणसाचा त्रास आयुष्यभर काढू शकते. तिला गणित कळत नाही, मात्र आपला प्रियकर वा पती काहीतरी महान कार्य करतो आहे नि आपण त्यास योगदान द्यावे या विचाराने ती त्याची कच्च्या कामाची सारी कागदपत्रे जपून ठेवते. त्याचे कपडे स्वतः निवडते. रोज त्याच्यासोबत भांडणे करून त्याचा मंगळाचा त्रास कमी करते. त्याची बडबड अख्खा रस्ताभर ऐकून घेते, तेही स्वतः गाडी चालवत असताना अपघात न होऊ देता. ती सारेकाही निमूटपणे सहन करते! मात्र तोच शुक्र शनि वा राहू-केतुला जाउन मिळाला की मात्र इतर वेळी सुंभासारखे पडून असणारे हे ग्रह आपला प्रभाव दाखवू लागतात! हे शक्यतो या लोकांच्या तरूणपणात घडते. कारण नसताना कोण्या मुलीच्या प्रेमात पडतात. ती शक्यतो आर्टस्, बायो किंवा इंजिनीअरींगची असते. ह्या मुलीला आधी कमीत कमी दोन वर्षे तरी हा गणिती ओळखत असतो किंवा बालपणापासूनही ओळखत असावा, नि अचानक ही जाणीव होते. शुक्र जेवढा बलवान, तेवढे हे त्या मुलीपासून दूर असतात. दशा संपण्याच्या अखेरच्या काळात ते ह्या मुलीकडे जातात नि तेव्हाच तिच्या प्रियकराचा फोन आलेला असतो, तो अमेरीकेहून किंवा बेंगलोर-मैसूर मधील नामवंत कंपनीतून बोलत असतो. ती त्याला बर्याच गोड गोड नावांनी संबोधते. तरीही आपले घोडे पुढे रेटत फोन ठेवताच तो तिला उपरोधृत वाक्यांपैकी एखादे वाक्य म्हणून दाखवतो. त्याच्या निरागस चेहर्याकडे पाहत ती बालिका आपण कसे त्यास खुपच चांगला मित्र म्हणुन पहातो, वगैरे, वगैरे समजावून सांगते. "तुला, माझ्याहून कोणीतरी खुप चांगली नक्की भेटेन ” असे शनि (अथवा रा-के) तिच्याकडून वदवून घेतात. असा माणूस काही काळ फार अघोरी गोष्टी करतो. तो जर रिमानची भुमिती शिकत असेल तर काही काळ कम्युटेटीव्ह अलजेब्रा करु लागतो, तेही मात्सुमुरा वा बुर्बाकीच्या पुस्तकातून, तो जर नंबर थिअरी करत असेल तर डिफरंशिअल ईक्वेशन्स वाचू लागतो, क्याटेगरी थिअरी शिकणारा असेल तर अचानक कम्प्युटर सायन्सची पुस्तके वाचू लागतो, अल्जेब्राईक जिओमेट्रीवाला फंक्शनला अँनालिसीस वाचू लागतो, आणि तत्सम प्रकार. मात्र शुक्राची दशा संपताच पुन्हा सारे काही जागेवर येते. एक सल्ला असा आहे की एरवी तुम्हाला जर कोणी मुलगी आवडत नसेल तर ती सोबत असताना एका गणितीमित्रास बोलवा. तो नक्कीच तिला असे जेरबंद करेन की पुन्ह्यांदा ती दिसल्यास ह्या मित्रांचे नाव काढा नि ती खात्रीने पळून जाईल!

     अस्तु, या लोकांवर सरस्वतीचा वरदहस्त असतोच. आपला विश्वास बसणार नाही, मात्र, लक्ष्मीचाही असतो. मात्र,यांचा बुध कायमच लक्ष्मीकडे कधी ढुंकूनही पाहत नाही! नेपच्युनने लक्ष्मी वा प्रसिद्धी ओढून आणली की शनी त्याला दारातील मरतुकडे कुत्रे असल्याप्रमाणे हाकलून लावतो. स्वतः बिलगेट्सने येऊन मायक्रोसाँफ्ट सेव्हनची खरीखुरी करकरीत काँपी (फुकटात) भेट दिली वा अँपलने मँकपँड-प्रो (फुकटात) दिले तरी हे लोक अभिमानाने युबुंतु वा स्युस् असे लिनक्स वापरतील. विष्णुच्या आईनंतर (म्हणजे लक्ष्मीच्या सासूनंतर) लक्ष्मीला उंबर्यातच थांबवण्याचे सामर्थ ह्या लोकांत असते! या लोकांचे भौतिकशास्त्रज्ञांवरील- फिजिक्समधील माणसांवरचे प्रेम हा खरे तर एक स्वतंत्रपणे एक ग्रंथ लिहीता येईल असा मुद्दा आहे. पण इथे त्याचा फारसा उहापोह नको. जमल्यास भाग दोन काढू. मात्र एक फार महत्वाचे निरीक्षण नमूद करावेसे वाटते, तेसे की गणित्यांच्या अन् भौतिकशास्त्रज्ञांच्या पत्रिकेत आम्हास बरेच साम्य आढळून आले. पण काही ठळक फरक असे की, भौतिकशास्त्रज्ञ्यांच्या पत्रिकेत मंगळ बराच सौम्य असून, गुरु कायमच त्याला निष्प्रभ करतो. गणित्यांच्या मानाने यांचा गुरु कसाबसाच असतो. मात्र यांचा बुध नि नेपच्युन जबरदस्त असतात. एखादा गणिती वीस पाने लिहून काहीतरी करीन नि ते कळाले नाही म्हणून त्याला कोणी नोकरी देणार नाही असेही होईल. परंतु, त्याच शोधनिबंधाच्या पहिल्या पानावरील प्रस्तावना समजून घेउन भौतिकाच्या भाषेत छापली की एखादा भौतिकी नोबेलही सहजच मिळवीन! राबणे नि स्मार्ट वर्क यांना शोभणारे शब्द म्हणजे गणिती नि भौतिकशास्त्रज्ञ!

     लेखकाच्या अभ्यासानुसार, गणिताच्या लोकांचे भाग्य शक्यतो त्यांच्या अर्ध्या गोवर्या स्मशानात गेल्यावर लखलखीत उजळते. त्यांनी विसाव्या वर्षी केलेल्या कामाचा उलगडा होउन त्यांच्यावर पुस्तके, कादंबर्या लिहीले जातात, जाहीर सत्कार होतात, भरघोस शिष्यावृत्त्या मिळतात, नि या वेळी त्या त्याना परत करता येत नाहीत (असा अनुभव आहे). त्यांच्या कामाचा वापर करून बरेच शोध लागतात. प्रत्येक पत्रकार असा शोध वापरून बनवलेले यंत्र संभाळत हाच प्रश्न विचारतो की तुम्ही जे केलेय त्याचा नेमका वापर काय! अशावेळी त्याचा सरळमार्गी शनी शक्यतो असे काही वदवून घेतो- "मी जे केले ते मला आवडले म्हणून केले. त्याचा कुठे वापर व्हावा अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. झालास तर सोबानोव्हस्कीचे कंजक्चर सोडायला व्हावा अशी मनिषा बाळगली होती, ती काही पुर्ण झाली नाही, पण त्या इंजीनिअर की फिजिक्सच्या लोकांनी कुठेतरी ते वापरलेय, असे ऐकीवात आलेय...” त्या पत्रकाराला कोण सोबानोव्हस्की हे माहित नसते, त्याचे कंजक्चर काय, किंबहुना "कंजक्चर” कशाशी खातात हेही ठाउक नसते. त्याला फक्त हेडलाइन मिळते "पुन्हा एकदा गणित फिजीक्सवर गडगडले..!!!” 

प्रस्तुत लेखकानेही काही काळ गणित नावाचा प्रकार शिकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यास असे जाणवले की ही माणसे रोखठोक बोलतात, नको तिथे संयम नसल्याप्रमाणे जे वाटले ते बोलून जातात, पण ते कोण्या ग्रहाच्या प्रभावाने नाही तर गणिताच्या खरेपणाच्या प्रभावाने होत असावे! त्यांचे आयुष्य कशानेच बांधलेले नसते, सत्यसंशोधनात जे हाती लागेल, त्या थिअरीला कुरवाळत चायायचे नि तेच निसर्गाचे खरे रूप असे म्हणून जगायचे, हा यांचा स्वभाव! बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात पहावे, कपडे चष्म्याला सूट होतील असेच घालावे, असली खोटी बंधने आपणा सारख्यांसाठीच. ह्यांना बोलताना दिसतो तो सृष्टीचा नियम.. हाती कागद-पेन लागला की अंगीच्या वस्त्राचे अस्तित्व विसरून जावे ते यांनीच... खरंच आयुष्य जगतात तर हे संपत्तीच्या खोट्या मोठेपणाला न जुमानता समीकरणातील १/२ चा फँक्टर कुठून आला, हे शोधण्याला खरे सुख मानणारे हे नियतीने बनवलेले बिलंदर कलावंतच ..!!!






(The picture are taken from internet, The author does not intend to break any copyright. Please notify the author (say by commenting on the post) to remove the picture(s) if necessary.)

No comments:

Post a Comment