Wednesday, August 10, 2016

टंकता, टंकता... देवनागरी टंक (Devanagari fonts)

हा लेख दिनांक २४/०५/२०१७ ला पुन्हा सुधारला आहे.
 
प्रस्तुत लेखामध्ये टंक आणि मराठी टंक यावर चर्चा केलेली आहे.
टंकाच्या पारंपरिक आणि आधुनिक, मात्र तांत्रिक, व्याख्या आपण पाहणार आहोत. अक्षरे काढण्याची शैली म्हणजे टंक, अशी एक सर्वसाधारण कल्पना असते; जी जवळपास बरोबर आहे.
राजमुद्रेवरचा ऐतिहासिक टंक, धार्मिक पुस्तकांमधील मोठा ठसठशीत बोरूने लिहिल्यासारखा दिसणारा टंक, नवनीतच्या पुस्तकातील नेटका सुस्पष्ट टंक, वर्तमानपात्रांचे टंक असे विविध टंक आपण नित्याने पाहत असतो.
मुद्रणाच्या तंत्रज्ञानामुळे माहिती व ज्ञानाचा प्रसार करणे सोपे झाले. कागदांंवर छापलेल्या स्वरूपात माहिती व ज्ञान सहजगत्या आणि स्वस्तात लोकांपर्यंत पोचवणे शक्य झाले.
वाचकांसाठी सुंदर आणि सुलभ दिसणारे लिखाण टंक टंक-निर्माते बनवू लागले.
वाचनास एक सुखद अनुभव बनवणार्या या टंक बनवण्याच्या शास्त्राची नाममात्र ओळख आपण करून घेऊ.
आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात या टंक बनवणार्यांना टंक बनवताना काय विचार करावा लागतो, हे टंक आपण वाचकांनी कसे वापरावेत आणि मराठीसाठी कोणते सुंदर टंक उपलब्ध आहेत हे यासुद्धा आपण पाहू.
लेखाच्या शेवटी भरपूर संकेतस्थळे दिली आहेत: त्यावरील लेख जरूर वाचा; तिथे िलेले आणि तुम्हाला आवडलेले टंक तुमच्या संगणकात प्रस्थापित करा; आणि खाली उल्लेख केलेल्या चित्रफितींचा आस्वादही नक्की घ्या!
या लेखात काही मिरच्या नाहीत. निवांत वाचा!

मुद्रणाचा इतिहास आणि टंकशास्त्राचा उगम

अक्षर सुंदर असावे म्हणून शाळेमध्ये कित्ता गिरवणारी १९५० च्या आसपासची पिढी झाली, पाटीवर काढलेली अक्षरे गिरवणारी पिढी झाली, मग मोजक्या रेषा आखलेल्या वहीत अक्षरे लिहिण्याचा सराव करणारी पिढी आली, आणि १९९०च्या आसपास प्लास्टिकच्या कोरीव पाटीवर अक्षरे गिरवणारे विद्यार्थी होते. हस्ताक्षर सुंदर करणे, हाच एकमेव हेतू या सार्यांच्या कष्टांमागे होता. आणि हस्ताक्षर सुंदर का असावे बरे? तर लिखाण दिसायला सुंदर आणि वाचायला सुलभ असावे, याकरीता!

याही पूर्वी, जेव्हा हाताने पुस्कके लिहली जायची, तेव्हा तर या सुंदर हस्ताक्षर नामक गुणाची खुपच चलती होती. शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी चित्रे हे त्यांच्या सुंदर हस्ताक्षरासाठी प्रसिद्ध होते. दासबोधाचा दशक १९ मधील पहीला समास, "लेखनक्रियानिरुपण", लेखन कसे करावे यासाठी वाहीला आहे. बोरुचा टाक किती तासावा; समास किती सोडावेत; अक्षर सुंदर असावे म्हणजे कसे असावे--- काना, मात्रा, वेलांट्या, कशा असाव्यात; इथपासुन ते पुस्तके कशी जपावीत हे समर्थ रामदासांनी तपशीलवार लिहीले आहे (खाली दुवा क्र ० पहा). आपल्या मराठी भाषेपुरता बोलायचं झाला तर असा हा हस्ताक्षर, नि पर्यायाने, 'टंक' महीमा!
 
प्रत्येक व्यक्तीचे हस्ताक्षर विशिष्ट असते. प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक अक्षर काढण्याची विशिष्ट शैली असते, हे तर सर्वज्ञातच आहे. एकाच उत्तरपत्रिकेत दोन वेगवेगळी हस्ताक्षरे दिसली की विद्यार्थांनी `कॉपी' केली आहे, हे लागलीच शिक्षक ओळखतात; हा तर शाळकरी वयातील महत्वाचा अनुभव! अक्षरे काढण्याची विशिष्ट शैली म्हणजे ढोबळमानाने टंक. टंक म्हणजेच font बनवणे की कला आहे आणि त्याला भरपूर अभ्यास लागतो. टंक बनवण्यात खास ते काय, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे.

मुद्रणाचे तंत्र निर्माण झाल्यासापासून छापील लिखाणसुद्धा दिसायला सुंदर आणि वाचनास सुलभ असावे म्हणून विविध टंक शोधले गेले. पुढे जसाजश्या वाचकांच्या मागण्या नि गरजा वाढल्या, तसतसे टंक निर्मात्यांना अभ्यास वाढवावा लागला नि हळूहळू टंक बनवणे हे एक शास्त्र बनले. टंक या संकल्पनेचा उगम मोठा रंजक आहे. तो पहायचा असेल तर आपल्याला मुद्रणतंत्रज्ञानाचा इतिहास जाणून घ्यावा लागेल.

आपण सर्वप्रथम मुद्रणाची non-Electronics प्रक्रीया काय आहे हे पाहू: मुद्रण प्रक्रीया एका वेगळ्या स्वरुपात फार प्राचीन काळापासून अस्तीत्वात आहे. ते स्वरुप म्हणजे `शिक्का' मारणे. एखाद्या लिखाणाचा अधिकृतपणा सिद्ध करण्यासाठी राजाने अथवा व्यापार्याने आपली मुद्रा अंकीत करणे, ही पद्धत प्राचीन आहे. आशा मुद्रा सर्वच संस्कृतींत सापडतात. मुद्रा अंकीत करणे म्हणजेच शिक्का उठवणे, ही अतीशय प्राथमिक अवस्थातील मुद्रण म्हणावयास हरकत नाही. मात्र या मुद्रणाचा हेतू एखादे लिखाण वा चित्र कागद, कापड वा इतर एखाद्या साधनावर उमटवून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणे, हा नव्हता. असा हेतू असणारी पहिली मुद्रणाची  सुविधा साधारणतः इस २००च्या आसपास चीनमध्ये अस्तित्वात होती याचे पुरावे सापडतात. लाकडावर आकृत्या कोरून, शाई लावून हे रंगीत लाकूड कापडावर दाबायचे जेणे करुन आकृत्या कापडावर उमटतील, असे या मुद्रणाचे स्वरुप होते. ही नक्षी छापलेली कापडे विकावयास ठेवत.

१४४०च्या आसपास योहान गुटेनबेर्गने जर्मनीत पहीले मुद्रणयंत्र तयार करून क्रांती घडवली. शिक्के मारायचीच कल्पना त्याने यंत्राच्या स्वरुपात आणली होती. त्याचे यंत्र हे जणू एक प्रचंड मोठे शिक्के मारायचे यंत्र होते. हे यंत्र कसे काम करत असे? एका अक्षरासाठी एक ठसा, ज्याला तांत्रिक भाषेक खिळा म्हणतात, तो बनवायचा. म्हणजे काय तर D  हे अक्षर लिहिण्यासाठी एका छोट्या चौकोनी सपाट ठोकळ्यावर ᗡ कोरायचा. तो कोरताना पार्श्वभाग काढून टाकायचा आणि अक्षराची उंची जास्त ठेवायची---ऑफीसातले रबरी ठसे असतात तसे. मग हा खिळा शाईत बुडवाला आणि कागदावर दाबला की D छापला जाईल. Firefox fired the fire  हे वाक्य छापायचे असल्यास वाक्यातील प्रत्येक शब्दासाठीचे खिळे एका पट्टीवर नीट घट्ट लावून मग त्या खिळ्यांवर शाई लावायची आणि कागदावर हे खिळे दाबायचे. मग वरील वाक्य कागदावर छापले जायचे. एक पान छापण्यासाठी एकएका ओळींचे साचे एकाखालोखाल एक असे जोडले जात आणि ते वापरून पाने मुद्रीक केली जात. Firefox fired the fire हे वाक्य छापायला F, o, x, d,t,h या अक्षरांचा प्रत्येकी एक खिळा, e चे दोन खिळे आणि i, r, e, f चे प्रत्येकी तीन खिळे लागत.

 गुटेनबेर्गच्याच तत्वावर पुढील मुद्रणयंत्रे बनवली गेली. उदाहरणार्थ, आपल्याकडील प्रसिद्ध "शिळाप्रेस", ज्यांनी राजा रविवर्माची देवतांची चित्रे घरोघरी पोचवली, ती याच तत्वावर आधारीत होती. मात्र शिळाप्रेस आणि गुटेनबेर्गची खिळाप्रेस यांचे engineering पूर्णतः वेगळे असून, संशोधक यांना दोन वेगवेगळे प्रकार मानतात. फक्त पुढील काळात यंत्रे हाताने फिरवण्या ऐवजी इंजिनाने फिरवली जात आणि गुटेनबेर्गच्या काळात जे खिळे लाकूड कोरून बनवत, ते धातूंचे बनवले जात. या प्रक्रियेमध्ये typeface आणि font हे दोन महत्वाचे घटक होते. typeface म्हणजे खिळा. typeface साठी खिळा हा शब्द मुद्रणक्षेत्रामधे रोज वावरणारे लोक वापरीत; खिळ्यास शास्त्रिय भाषेत `टंक' म्हटले जाते.

या काळात मुद्रण किती त्रासदायक असेल याचा विचार करा! मुद्रणापूर्वी खिळे एकमेकांना जोडून सबंध पान  लिहून काढणे याला मराठीत "खिळे जोडले" असे म्हणत. हे खिळे बनवणे कष्टाचे तसेच कलात्मक काम होते. मुद्रीत अक्षरांची शैली शोधणे हे कलात्मकतेचे काम होते, तर धातूचे खिळे निर्माण करण्यास कारखान्यातील कसब आणि कष्ट लागत. बर्याचदा ही दोन्ही कामे करण्याची टंक निर्माताच करीत असे. आज Electronics नि संगणक क्षेत्रातही टंक निर्माते हेच करतात, फक्त खिळे बनवण्याऐवजी ते आज्ञावली (program) लिहीतात. पहीले मुद्रीत मराठी पंचाग गणपत कृष्णाजी पाटील यांनी छापले; त्यांना मराठीमधील आद्य मुद्रणकार मानले जाते. तर आद्य मराठी टंकशास्त्राज्ञ जावजी दादाजी चौधरी (टिचकी मारा) यांना मानले जाते. मराठीमधील "निर्णयसागर" पंचागाबद्दल तुम्ही ऐकले आहे का? जावजी दादाजी चौधरी यांनी १८६९ मुद्रणालय (छापखाना) स्थापन केला, तो आजतागायत सुरू आहे. जावजी दादाजी अतिशय उत्तम टंक बनबत. त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक आणि कुशलतेने बनवलेले मराठी आणि संस्कृत देवनागरीचे टंक केवळ भारतभरच नाही तर जगभर गाजले. कागदावर छापलेल्या पंचांगास निर्णयसागरने मुद्रीत पंचांग आणि देवनागरी ग्रंथ घरोघरी पोचवले. जावजी दादाजींचे टंक आणि मुद्रण सामान्य वाचक ते टंक संशोधकांच्याही आवडीस उतरले. तजावजी दादाजींनी आपल्या अभ्यासाने आधुनिक देवनागरी टंकशास्त्राचा पाय रोवला; या संदर्भातील एक पुस्तक खाली ९व्या दुव्यात दिले आहे.

आज आपण कोणते टंक, म्हणजेच अक्षरांच्या शैली, पाहत असतो? धार्मिक पुस्तकांती जाड ठशांची शैली नि सध्याच्या बर्याचशा online वर्तमानपत्रांत वापरली जाणारी 'मंगल' टंकाची शैली, किंवा रोमन लिपीतील Times New Roman आणि Comic Sans या दोन वेगवेगळ्या शैली आहेत. या प्रत्येक शैलीमध्ये अक्षरे तीन ठशांमध्ये लिहितात- normal, bold आणि italic. शिवाय अक्षरांचा आकार, जो Pt--- point या एककामधे मोजतात, तोसुद्धा बदलतो. सर्वसाधारणपणे १४ pt आकाराची अक्षरे A4 आकाराच्या कागदावर लिहिली जातात.

टंक, font, म्हणजे एकाच विशिष्ट शैलीमध्ये, ठशामध्ये आणि आकारामध्ये लिहिलेल्या वर्णअक्षरांचा संच होय. 
आपण टंकशास्त्र हा शब्द typography या अर्थाने वापरणार आहोत. याच अर्थाने `अक्षरमुद्राविद्या' असाही शब्द साहीत्यामधे वापरलेला दिसून येतो.

आधुनिक टंकशास्त्र

 ह्या झाल्या पारंपरिक मुद्रणातील font नि typeface च्या संकल्पना. आज मुद्रण या संकल्पनेमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. पहिले चिनी मुद्रण कापडावरील नक्षीसाठी केले होते, गुटेनबेर्गने कागदावर छपाई  केली आणि आज इलेक्ट्रॉनिक्स पाटलांवर अक्षरे उमटवली जातात; हे पूर्णतः इलेक्ट्रॉनिक्स मुद्रण आहे. यंत्रांवरील मजकूर "प्रिंटर" वापरून कागदावर छापणे ह्या प्रकारात कागद ही यांत्रिक नसलेली बाब असल्याने ते मुद्रण अगदी पूर्णतः इलेक्ट्रॉनिक्स म्हणता येणार नाही. आपण केवळ इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजेच यांत्रिक पटलांवरील, मुद्रणावर या लेखात लक्ष केंद्रित करणार आहोत. font म्हणजेच टंक नि typeface या संकल्पना या मुद्रणामध्ये जवळपास समानार्थी म्हणून वापरल्या जातात. कारण सॉफ्टवेअर म्हणून टंक म्हणजे वर्णाक्षरांची विशिष्ट शैली, त्या शैलीतील सर्व ठसे आणि सर्व आकार असलेले एक अख्खे package असते. त्यामुळे टंक नि typeface नि या संकल्पना सामान मानून हा लेख वाचला तरी काही हरकत काही नाही. मात्र या विषयातील जाणकार म्हणून काम करायचे असेल, तर मात्र हा फरक महत्वाचा आहे.
अक्षरे लिहिण्याची शैली बनवणे ही आजमितीस एक "तांत्रिक" कला आहे. कारण, एखाद्या fashion designer प्रमाणे या तंज्ञांना आधी अक्षराची style कलात्मकतेने शोधावी लागते.  अक्षराची ही नबी style वाचकांच्या गरजा भागवणारी असेल हे पहावे लागते. त्यासाठी त्या भाषेचा नि इतर टंकांचा अभ्यास करावा लागतो. हा झाला कलेचा भाग. मग संगणकात तशी आज्ञावली (program) बनवणे हा झाला तांत्रिक भाग.

टंक बनवताना ठोबळमानाने काय बाबींचा विचार होतो? लेखारंभी लिहील्याप्रमाणे सर्वच संस्कृतींमध्ये सुंदर हस्ताक्षराला अनन्य साधारण महत्व आहे. यांत्रिक काळामध्ये सुद्धा टंक बनवताना अक्षरे प्रमाणबद्ध असावीत, नीटस असावीत हा विचार करावाच लागतो. याशिवाय एक मुलभुत बाब पुढीलप्रमाणे: अक्षरांच्या पारंपरिक पद्धतीमध्ये कमी अधिक जाडीची अक्षरे काढण्याचा प्रघात सर्वच संस्कृतींमध्ये दिसतो. प्रारंभीच्या काळात टाक वा पक्ष्यांची पिसे आणि नंतरच्या काळात निब (nib) ने लिहिताना अक्षराची जाडी बदलत असे. ही पारंपारिक शैली टिकवण्याची प्रथा म्हणून यंत्रांवरही असे कमी अधिक जाडी असणारे fonts वापरले जातात. उदाहरणार्थ, Times New Roman वा Baskerville हे सुप्रसिद्ध जाडी बदलणारे fonts आहेत.
चित्र क्र. १. काही टंक

कागदावरील लिखाण वाचणे आणि यांत्रिक पटलांवरील लिखाण वाचणे यात फरक आहेत, आणि त्यामुळेच या दोन्ही प्रकारच्या वाचनात टंकही  बदलावे लागतात. कागद आणि यांत्रिक पटल यांतील महत्वाचा फरक असा की कागदावर  सूर्यप्रकाश पडून परीवर्तीत होतो नि लिखाण दिसते, तर यांत्रिक पटल स्वयंप्रकाशी असतात--- त्यांच्यातील छोट्या छोट्या चौरस भागांंना, ज्यांना pixels म्हणतात, त्यांंना कमी अधिक प्रकाशित करुन या पटलांवर अक्षरे (व प्रतिमा) निर्माण केल्या जातात. आताशा Kindle ने (टिचकी मारा)  कागदांसारखे पटल निर्माण केले आहे, मात्र  त्याचा वापर eBook Reader  सोडून इतरत्र होत नाही. यांत्रिक पटले स्वयंप्रकाशी असल्यानेच  त्याच्यासाठीच्या टंकामध्ये बदल करावा लागतो. कारण एका  मर्यादेपलीकडे या पटलांचा प्रकाश कमी होत नाही, त्यामुळे काही पारंपारीक कागदावरील लिखाणासाठी बनवलेले टंक या पटलांवर वाचताना त्रास होतो. जर टंक मध्ये अक्षरांची जाडी बदलत असेल आणि काही ठिकाणी जाडी खूप कमी झाली तर हा कमी जाडीचा भाग पटलाच्या प्रकाशात धूसर होतो आणि वाचायला जड पडते. तुमच्याकडील एखादी कमी-जास्त जाडी होणार फॉन्ट असलेला PDF दस्तऐवज Adobe Acrobat Reader मध्ये उघडा आणि "Night Mode" मध्ये पहा म्हणजे प्रकाशाची ही करामत  दिसेल. अशावेळी जाडी ना बदलणारा टंक सुस्पष्ट दिसतो. यामुळेच बर्याच मराठी वृत्तपत्रांनी त्याच्या e-वर्तमानपत्रांकरीता पारंपरिक जाडी बदलणारे टंक सोडून एकाच जाडीचा ठसठशीत टंक वापरायला सुरुवात केली आहे.

पारंपरीक जाडी बदलत जाणारे टंक नक्कीच सुंदर दिसतात. त्यामुळे टंक बनवणारे जाडी बदलताना अशा प्रकारे बदलण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून पटलाचा प्रकाश कमी जाडीचा भाग धूसर करणार नाही. मराठीसाठीचा "यशोमुद्रा" हा टंक  अशाच पद्धतीचा आहे.

चित्र क्र. २. Serif आणि Sans Serif
टंकांचे एक महत्वाचे वर्गीकरण आहे ते म्हणजे Serif आणि Sans Serif. डच भाषेत shreef म्हणजे "रेषा" आणि फ्रेंच मध्ये Sans (उच्चार- सान्) म्हणजे "शिवाय"--- Sans Serif म्हणजे रेषा नसलेले. त्याउलट Serif म्हणजे रेषा असलेले. कुठल्या रेषा? फॉन्ट्स मध्ये एखाद्या अक्षराच्या टोकांना छोट्या रेषा  दिसतात, चित्र क्र. २ पहा, त्या रेषा.

Comic Sans मधील प्रत्येक अक्षराचे प्रत्येक  गुळगुळीत असते, त्यामुळे तो Sans Serif आहे. Power Point बनवताना बऱ्याचदा लोक Serif टंक वापरतात . लक्षात घ्या की Power Point मध्ये मूळ लिखाण प्रकाशझोताच्या स्वरूपात पांढऱ्या पडद्यावर पडून, तिथून  होऊन वाचकांना दिसते. यात बराच प्रकाश वायाजातो नि अक्षरे बरीच अंधुक होतात. जर Serif टंक वापरला असेल, तर अक्षरांच्या टोकाच्या रेषा अतिशय पातळ असल्याने पुरेसा प्रकाश परावर्तित करू शकत नाहीत; त्या धूसर होतात. आणि प्रत्येक अक्षराच्या सर्वच टोकांना असा धूसरपणा आल्याने एकूणच लिखाणाचा ठसठशीतपणा जातो. उलटपक्षी, जर Sans Serif टंक वापरला तर अक्षरांच्या टोकावरील रेषा नसल्याने आणि ठसठशीत अक्षरे असल्याने अक्षरावरून परावर्तित होणारा प्रकाश वाया जात नाही; अक्षरे उठून दिसतात. Power Point सारख्या प्रकारांत Serif ऐवजी Sans Serif वापरावा. 

आजकाल यांत्रिक पटलांचे "resolution" ही दिवसेंदिवस उत्तम होत असल्याने टंक सुंदर आणि सुस्पष्ट दिसण्यासाठी काळजी घेतली जाते.

फॉन्ट बनवताना महत्वाचा विचारात घेतला मुद्दा  म्हणजे ज्या कामासाठी लिहायचे आहे, त्या करता अक्षरांची शैली उपयुक्त आहे का? कोणत्या कामासाठी टंक वापरायचा आहे हे महत्वाचे असते. उदाहरणार्थ, नोकरीसाठी अर्ज करताना लिहिलेल्या पत्रामध्ये शिवकालीन शैली वापरली तर विचित्र वाटेल, नि एखाद्या पारंपरिक कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये Comic Sans शैली वापराणे म्हणजे कार्यक्रमाचा रंग घालवल्यासारखे होईल. वाचन करताना लिखीत मजकुर वाचकासोबक बोलत अमतो. लिखाणातील टंकशैली वाचकाभोवती वातावरण निर्माण करत असते. त्यामुळे लेखनातील मजकुरास पूरक असा टंक वापराने फार गरजेचे असते. प्रेमपत्र लिहिताना "Accanthis" सारखा फॉन्ट वापरला तर ते सुंदरच नाही तर भारदस्त वाटेल, पण त्याच ठिकाणी वर्तमान पत्राचा टंक  वापरला तर पत्रातील मजकूर special न वाटता, काहीसा रोज सहजासहजी प्रत्ययाला येणारा पण परका वाटेल, आणि भावनांना बातमीचे स्वरूप येईल!

प्रत्येक टंक बनवताना तो कुठे वापरायचा आणि त्यातून काय भाव व्यक्त होतील याचा अभ्यास केला जातो. राजेशाही थाटाचा पण सुंदर नि सुबोध असा Accanthis, टाईपरायटर ची आठवण करून देणारा Courier,, अल्लड वाटणारा Comic Sans, पारंपरिक कचेऱ्यांतील Times New Roman, Times New Romanचाच थाट असणारा मात्र तोऱ्यात वावरणारा Baskarville आणि तांत्रिक दृष्ट्या उत्तम डोळ्यांवर कमीत कमी ताण देणारा तरीही रुक्ष नसलेला Ubuntu असे प्रत्येक टांकाचे स्वतःचे भाव नि हेतू आहेत.

वरील तांत्रिक मुद्द्यांशिवाय अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अक्षर, म्हणजेच पर्यायाने टंक, सुंदर नि नीटम दिसणे हा आहे. दोन अक्षरांतील सापेक्ष उंची आणि रुंदी छान दिसेल अशी हवी. एका अक्षराच्या मानाने दुसरे फारच खुजे वर रुंद वाटतं कामा नये. अक्षरे फार वाकडी तिकडी दिसू नयेत. असेही मुद्दे टंक बनवताना विचारात घ्यावे लागतात.

तांत्रिक दृष्ट्या सध्या टंकांचे दोन प्रमुख प्रकार आहेत TTF-- True Type Font आणि OTF-- Open Type Font. TTF हा प्रकार Apple आणि Microsoft ने एकत्रितपणे आपल्या प्रणालींकरिता १९८० च्या सुमारास निर्माण केला. तर Adobe Systems आणि Microsoft ने १९९६ दरम्यान OTF ची निर्मिती केली. या दोन्ही प्रकारचे टंक Windows, Mac आणि Linux या सर्व संगणक प्रणालींवर install म्हणजेच प्रस्थापित करणे आताशा टिचकीचे काम झाले आहे. सहसा प्रस्थापित करायच्या टंकाच्या .TTF वा .OTF असा शेवट असणाऱ्या फाईल मिळवायच्या आणि त्यावर दोन टिचक्या देऊन "Install this font" अशा अर्थाचे जे काही असेल त्यावर शेवटची टिचकी मारायची, की झाला तो टंक प्रस्थापित! जर जुन्या संगणक प्रणाली असतील, तर  काय करायचे हे Google काकांना विचारा. अशा वेळी या .TTF वा .OTF फाईलस् एका विशिष्ट फोल्डरमध्ये ठेवायच्या असतात.

यांत्रीक पटलांवर टंक बनवताना उद्भवणारा अजून एक कळकळीचा तांत्रिक मुद्दा म्हणजे त्यांचे encoding--- संकेतप्रणाली.  जगभरातील संगणकांना; आज्ञावली वाचून काम करणारे कोणताही यंत्र मग तो तुमचा smartphone असो वा laptop; अक्षरे, अंक नि मुलभूत चिह्ने वाचता यावीत म्हणून प्रत्येक अक्षर, अंक व मुलभूत चिह्न संगणकास कळेल अशा स्वरुपात encode करावे लागते, या प्रक्रियेस encoding म्हणतात. Digital electronics, programming असे विषय शिकताना Morse code, ASCII अशा विविध संकेतप्रणाली तुम्ही पाहिल्या असतील. एक उत्तम संकेतप्रणाली सर्वांनी स्विकारून तिला सर्वमान्य वैश्विक संकेतप्रणाली (Universal encoding system) करायचा प्रयत्न तंत्रज्ञ करत असतात.

जर अशी सर्वमान्य संकेतप्रणाली नसेल तर काय होते? एका संगणकावर (देवनागरीत) लिहिलेला Word दस्तऐवज दुसऱ्या संगणकावर वाचता येत नाही, काही देवनागरी संकेतस्थळे एखाद्या संगणकावर दिसत नाहीत असं कधी तुमच्या सोबत झालंय? याचे कारण त्या Word दस्तऐवजात वापरलेली संकेतप्रणाली वा संकेतस्थळाने वापरलेली संकेतप्रणाली दुसर्या संगणकावर प्रस्थापित नसते! असे घोळ होऊ नयेत म्हणून सर्वमान्य संकेतप्रणालीचा अट्टहास धरला जातो. सध्या Unicode संकेतप्रणालीस हा दर्जा देण्याचा प्रयत्न सुरू आहे; त्यामुळे Unicode आधारीत टंकच वापरावेत, हे योग्य! सर्व यंत्रांवर केवळ युनिकोड टंक वाचण्याची सोय झाली की कमीत कमी कष्टांत हवा तो टंक प्रस्थापित करुन वापरता येतील. सर्व महत्त्वाचे टंक सध्या युनिकोडमध्ये उपलब्ध आहेत.

आज देवनागरीसाठी बरेच टंक उपलब्ध आहेत. मात्र उत्तम टंक कमीच आहेत, असे मला वाटते. प्रा. रघुनाथ कृष्ण जोशी यांनी बनवलेला 'मंगल' हा मोठ्या प्रमाणात मराठी व हिंदीमध्ये वापरला जाणारा टंक आहे. हा टंक Sans Serif असून सामान जाडीचा आहे. मात्र तो कितपत सुंदर आहे, हा निदान मला तरी चर्चेचा विषय वाटतो. हिंदीसाठी 'Kruti Dev' ही प्रसिद्ध आहे. संस्कृतसाठी 'Sanskrit 2003' हा चांगला टंक आहे; Sanskrit 2003 मधील अक्षरे टोकदार बोरू व उत्तम पातळ शाई वापरुन काढल्यासारखी असून, ती सलग काढली नाहीत. त्यामुळे बोरूने लिहिताना शाई संपल्यामुळे जो तुटकपणा येतो, तो परिणाम साधला आहे. मात्र असा तुटकपणा असूनही हा टंक ठसठशीत आहे. हा टंक download करण्यासाठी खाली दुवा दिला आहे.

मराठीसाठी राज्य मराठी विकास संस्थेने सीडॅक, पुणे (जीस्ट गट) ह्यांच्याकडून "यशोवेणू" आणि "यशोमुद्रा" असे दोन TTF युनिकोड टंक तयार करून घेतले आहेत. दोन्हीही टंक खूपच सुंदर आहेत. ह्यांपैकी यशोवेणू हा Sans Serif, आणि यशोमुद्रा हा Serif टंक आहे. यशोमुद्रामध्ये बोरूने लिहिल्याप्रमाणे  अक्षरे दिसतात. जाडी कमी जास्त होऊनही अक्षरे ठसठशीत आहेत. पारंपरिक लेखनशैलीच्या फारच जवळ हे दोन्ही टंक जातात. आणि हे टंक कागदावर छापल्यावरही सुंदर दिसतात. हे टंक download करण्यासाठीचे दुवे खाली दिले आहेत.

IIT Bombay च्या प्रा. गिरीष दळवी यांनी बनवलेला "मुक्ता" (Mukta) हा Open Source टंक ही सुंदर समरेखा (जाडी न बदलणारा) Sans Serif टंक आहे. याची विनामूल्य वापराची Open Source आवृत्ती download करण्यासाठी खाली दुवा दिला आहे. याच टंकाची विनामूल्य नसलेली "एक टाईप (Ek Type)" आवृत्तीही (टिचकी मारा) खुप सुंदर आहे; मात्र या घडीला ती फारच महाग (₹ २१,०००) आहे.

जाता जाता
लिपी एकाच असली तरी लिपी लिहिताना भाषेप्रमाणे काही बदल होतात; काही वेळा हे बदल केवळ अक्षरांची वळणे बदलणे एवढ्या पुरतेच मर्यादित राहत नाही, तर काही अक्षरे अगदीच बदलतात. उदाहरणार्थ, पारंपरिक हिंदी मधील 'अ' हा संस्कृत नि मराठी मधील 'अ' हून खूप वेगळा असतो; तो बऱ्याचदा मराठीमधील 'प्र' सारखा दिसतो, चित्र क्र. ३ पहा. देवनागरीच्या "सहदेव (Sahadeva)" टंकामधे असा 'अ' दिसून येतो. हिंदी आणि मराठी मधील आठ हे अंक वेगळे असतात. इतकेच काय, तर मराठीमध्येच आपण डोकेफोड्या "श" ("श" शहामृगाचा ), व "ल" लिहिताना दोन प्रकारे लिहितो. टंक लेखकांना अशा सर्व बारकाईचा अभ्यास करावा लागतो. (आता या पैकी मराठीसाठीचे सरकारमान्य व सर्वमान्य श आणि ल आहेत का, असल्यास कोणते, हे तुम्ही शोधून पहा पाहू!). 
चित्र क्र. ३

भाषेप्रमाणे टंक बदलण्याचा अजून एक उदाहरण असे की संस्कृत टंकाचा ठसा एरवी जाड असतो नि अक्षरांचा आकारही मोठा असतो, तर त्यामानाने मराठी-हिंदीचे टंक पातळ नि लहान असतात. याचे टंकशास्त्रीय कारण असे देता येता की संस्कृतमधे संधी करून लिहीण्याच्या प्रथेमुळे शब्दांची लांबी आणि एकाच शब्दातील जोडाक्षरांची संख्या बर्याचदा प्रचंड वाढते. जाड आणि मोठा टंक असेल तर असे क्लिष्ट शब्द वाचणे सोपे पडते.

एकूणच चर्चेवरून आपल्या लक्षात आलेच असेल की टंक मुद्रीत भाषेचे सौंदर्य व वाचनाची सुलभता वाढवतो. मात्र दोन भाषा एकच लिपी वापरात असतील, तर त्यांच्या लिपींचे पारंपरिक वळण वेगळे असणे अगदीच शक्य आहे, किंबहुना तसे होतेच. त्यांमुळे एकाच लिपीसाठी दोन भाषांचे टंक वेगळे असणे शक्य आहे. किंबहुना टंकामधून त्या भाषेच्या लिपीचे पारंपरिक वळण जपले गेले किंवा त्या भाषेतील शब्द जास्त सुलभ झाले तर उत्तमच!

यादवकालीन, शिवकालीन व तत्पश्चात, जेव्हा मोडी ही मराठीची अधिकृत लिपी होती, तेव्हा मराठी देवनागरीचे वळण खूपच वेगळे होते. ती फार लयदार होती. शिवाजींच्या "राजमुद्रे"वर ते दिसून येते. अशा वळणाचा (digital) टंक निदान मला माहीत नाही. तुम्हाला माहीती असल्यास कळवा, आणि असा टंक नसेल तर तो बनवता आल्यास काय बहार येईल! मात्र हे काम खूप अभ्यासाचे आणि कष्टाचे आहे, हे नक्की!
चित्र क्र ४. मोडी ही मराठीची अधिकृत लिपी होती, तेव्हाचे मराठी देवनागरीचे एक उदाहरण* (तळटीप पहा)

केवळ लिपी दर्शवणाऱ्या टंकाची ही कथा! पूरक वाचनासाठी आणि संदर्भाखातर खाली काही लेख आणि चित्रफितींचे दुवे दिले आहेत. श्री. सुशांत देवळेकर यांनी देवनागरी युनिकोड टंक मोफत उतरवून घेण्यासाठीच्या दुव्यांचा संग्रह केला आहे, खाली त्याचा दुवा दिला आहे. मराठी आणि संगणक या संदर्भात त्यांनी बनवलेल्या संकेतस्थळाचा व चित्रफीत संग्रहाचा दुवासुद्धा भेट देण्याजोगा आहे; तोसुद्धा खाली दिला आहे.

जाता जाता एक गमतीदार किस्सा सांगतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना Comic Sans कधी ना कधी आवडला असेल (मला स्वतः लाही हा टंक आवडायचा). Microsoftने काही कारणास्तव बनवलेला हा टंक आहे. पण टंक बनवणाऱ्या संशोधकांच्या मते हा अतिशय वाईट आणि अशास्त्रीय टंक आहे. सर्व जाणकार या टंकाच्या नावाने शंख करत असतात.  तंज्ञच्यामते Comic Sans मध्ये भरपूर तांत्रिक चुका आहेतच पण "तात्विक" दृष्ट्याही तो फार उथळ आहे! पण गंमत अशी की जगातील सर्वात प्रसिद्ध टंकापैकी Comic Sans आहे! या विषयावरील Vsauce ची खालील चित्रफीत तुम्हाला नक्की आवडेल!
 
                                                         ∆  ∆  ∆

* तळटीप: हे छायाचित्र internet वरून घेतले आहे. जेथून घेतले, तिथे Copyright बद्दल काही सूचना नव्हती. हक्कभंग करण्याचा आमचा काहीही मानस नसून, तसे होत असल्यास निदर्शनास आणून द्यावे, छायाचित्र काढले जाईल.


ता.क.: श्री. सुशांत देवळेकर यांनी लेखातील काही उणीवा व लिखाणातील चुका दाखवल्या, त्या आता सुधारल्या आहेत. आम्ही त्याचे आभारी आहोत. त्यांनी दिलेले काही दुवेही खाली देत आहोत.

 दुवे:

०. दासबोधाचा दशक १९ मधील पहीला समास "लेखनक्रियानिरुपण"साठी दुवा:
http://www.dasbodh.com/2012/07/blog-post_8155.html

१. मुक्त (Open Source) आणि विनामूल्य असलेले यशोवेणू, यशोमुद्रा, संस्कृत २००३ आणि शोभिका मिळवण्यासाठीचे दुवे:
https://github.com/RajyaMarathiVikasSanstha/Yashovenu/releases

https://github.com/RajyaMarathiVikasSanstha/Yashomudra
http://www.omkarananda-ashram.org/Sanskrit/itranslator2003.htm
https://ctan.org/tex-archive/fonts/shobhika?lang=en

प्रा. गिरीष दळवी निर्मीत "मुक्ता" हा मुक्त (Open Source) आणि विनामूल्य टंक मिळवण्यासाठीचा दुवा
https://github.com/EkType/Mukta/releases

२. C-DAC ने यशोवेणू व यशोमुद्रा जाहीर केलेली बातमी
 http://www.cdac.in/index.aspx?id=pk_itn_spot866 

३. श्री. सुशांत देवळेकर यांचा देवनागरी युनिकोड टंकांचा संग्रह: 
https://sites.google.com/site/yunikodatunmarathi/tanka

४. श्री. सुशांत देवळेकर यांचे मराठी आणि संगणक संदर्भातील संकेतथळ:
http://vechak.org/

५. श्री. सुशांत देवळेकर यांचा मराठी आणि संगणक या संदर्भातील चित्रफीतीचा दुवा:
https://www.youtube.com/user/sushantdevlekar/videos

६. मंगल या टकाचे जनक प्रा. रघुनाथ कृष्ण जोशी यांच्यावरील एक मटा मधील लेख:
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2786346.cms

७. Vsauce ची Comic Sans वरील चित्रफीत:

८.Typeface आणि Font यांतील फरक सांगणारा लेख"
http://www.fastcodesign.com/3028971/whats-the-difference-between-a-font-and-a-typeface

९. श्री. सुशांत देवळेकर यांनी सुचवलेले दुवे:
लेख
मुद्राक्षरांचे सौंदर्यशास्त्र
http://www.loksatta.com/abhikalpa-news/a-font-is-the-combination-of-typeface-1214050/

एका अक्षराचे शवपरीक्षण
http://www.loksatta.com/abhikalpa-news/vernacular-font-formation-is-time-consuming-process-1252737/

पुस्तके
निर्णयसागरची अक्षरसाधना
http://www.dli.ernet.in/handle/2015/310269

देवनागरी मुद्राक्षरलेखनकला
http://www.dli.ernet.in/handle/2015/448743

दृक्श्राव्य सामग्री
मुद्राक्षरविद्येवरील काही व्याख्याने
http://www.dsource.in/course/digital-typography-1

साधने
देवनागरी टंकांविषयीचे शोधसाधन
http://dsquare.in/devft/en/index.php

टंकांची दृश्य वैशिष्ट्ये तपासण्याच्या चाचण्या
http://www.impallari.com/testing/index-devanagari.php

१०. गणपत कृष्णाजी पाटील यांवरील एक लेख
http://www.loksatta.com/daily/20090224/mv04.htm

११. गुगुलचे काही टंक उतरवून घेण्यासाठी दुवा
https://fonts.google.com/?subset=devanagari

अरे हो! हा लेख गणिताशी कसा संबंधित आहे? "माझा गणिताची बोलू कवतुके" वर का टाकलाय, हे सांगायचंच राहीलं की! तर तो (बादरायण) संबंध असा की LaTeX शिकत असताना मी font या प्रकरणात होतो नि तेव्हा कुतूहल चळावलं म्हणून हे वाचन केला होत!! त्यातही LaTeX देवनागरी शिकताना देवनागरी टंकाशी बरीच बाचाबाची झाली होती! या सर्वांची ही निष्पत्ती!

2 comments: